पुण्यात भाजपला धक्का बसणार; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक निष्ठावंताना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. अशातच आता पुण्यात भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. गेली २५ वर्ष भाजपा मधे विविध पदांवर कार्यरत असलेले व स्वतःच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारे पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
अमराळे यांनी २०१२ मधे महापालिका निवडणूक लढवली होती. काही मताने त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हापासून त्यांना महानगरपालिका व विधानसभेसाठी भाजपकडून डावलले आहे. २०२६ च्या निवडणुकीत सुद्धा त्यांना प्रभाग १२ (छ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी) मधे त्यांना डावलण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वसाधारण गटात महिला उमेदवार देवून अमराळे यांच्यावर मोठा अन्याय केला गेला आणि हे सर्व एका नेत्याने जाणीवपूर्वक घडवून आणले असल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
गेली २५ वर्ष सातत्याने या भागात त्यांनी देश – परदेशात ५५ यात्रांचे आयोजन केलेले आहे. त्यातून ३५००० नागरिकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला आहे. मोठ्या संख्येने हळदी कुंकू, रक्षाबंधन, कोजागिरी असे समारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ३००० हून अधिक नागरिकांना व पोलिस बांधवांना वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले आहे. पालखी मार्गावर निर्मल वारी अभियान यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दैनंदिन नागरिकांच्या अडचणी सोडवत असल्याने आणि नम्र व प्रेमळ स्वभावामुळे त्यांची मोठी लोकप्रियता या भागात असल्याचे दिसून येते. यामधून स्वतःची मोठी वोट बँक त्यांनी निर्माण केलेली आहे.
अमराळे यांच्या या निर्णयाने प्रभाग १२ च्या निकालावर परिणाम होवू शकतो हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्य नेत्यांकडून मोठे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी सायंकाळी हा पक्ष प्रवेश होणार आहे, असेही अमराळे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.











