पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव, गुंडगिरी, ‘मसल पॉवर’ किंवा ‘मनी पॉवर’चा वापर झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
एका विशेष मुलाखतीत बोलताना आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणीही असो, कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. निवडणूक काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलीस दल गय करणार नाही.”
उमेदवारी देणे हा राजकीय पक्षांचा विषय
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आयुक्तांनी स्पष्ट भूमिका मांडली. राजकीय पक्षांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा निर्णय आहे. प्रचलित कायद्यानुसार जे पात्र आहेत ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यावर पोलीस आयुक्त म्हणून भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दबावतंत्राला पूर्णपणे आळा
निवडणूक काळात मतदारांवर दबाव आणण्याचे, दहशत निर्माण करण्याचे किंवा हिंसाचाराचे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. “फ्री अँड फेअर इलेक्शन पार पाडणे ही आमची जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक निर्भयपणे मतदान करतील, यासाठी पोलीस दल पूर्ण ताकदीने काम करेल,” अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण रोखण्यासाठी कठोर भूमिका
शहरात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे उदात्तीकरण (Glorification) होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद करत आयुक्त म्हणाले की, यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता वाढते. सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून होणारे गुन्हेगारांचे उदात्तीकरण रोखण्यासाठी पुणे पोलीस युद्धपातळीवर कारवाई करत आहेत.
जेलमधून निवडणूक लढवणाऱ्यांवर करडी नजर
सध्या गंभीर गुन्ह्यांत अडकलेले तीन उमेदवार जेलमधूनच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या हालचालींसह त्यांच्या समर्थकांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असून, कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
गुन्हेगारीचे आर्थिक कंबरडे मोडणार
गुन्हेगारी टोळ्यांनी बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “गुन्हेगारीचे आर्थिक फाउंडेशन नष्ट करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे ठाम मत आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
निवडून आल्यानंतरही कायद्यापासून सूट नाही
“उमेदवार निवडून आला तरी कायद्याचे उल्लंघन केल्यास किंवा गुन्हेगारी कृत्यात सहभागी आढळल्यास त्याच्यावर तितकीच कठोर कारवाई होईल,” असा स्पष्ट संदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिला.
पुणे शहर सुरक्षितच राहणार
पुणे शहर सुरक्षित आहे आणि सुरक्षितच राहील. कोणत्याही परिस्थितीत शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू दिली जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना निर्धास्त राहण्याचे आवाहन केले आहे.












