पुणे : विमाननगर परिसरातील एअरपोर्ट रोडवरील एका हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत बेकायदा डान्स पार्टी आणि मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर पोलिसांनी पहाटे साडेचारच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. याठिकाणी सुमारे ३० जण, त्यामध्ये २४ पुरुष आणि सहा तरुणी, मद्यपान करून नाचत असल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये मद्यविक्री आणि ग्राहकांना मद्य पुरवण्यासाठी आवश्यक परवाने नसल्याचे चौकशीत समोर आले.
रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्तासह छापा टाकला. कारवाईदरम्यान हॉटेल मालक नितीन जाधव, युवराज नायडू, व्यवस्थापक दीपक कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या पुरुषांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले, तर तरुणींची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ हजार ६९० रुपयांचा मद्यसाठा तसेच साऊंड सिस्टीम आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विमाननगर पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पार्ट्या, विनापरवाना मद्यविक्री आणि इतर बेकायदा व्यवसायांविरोधात कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.











