September 4, 2026 8:51 am

दूध भेसळविरोधी कारवायांचा परिणाम; जिल्ह्यात दूध संकलनात मोठी घट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एफडीएच्या धडक मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती; शुद्ध दुधाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता

सातारा : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दूध भेसळविरोधात सुरू केलेल्या धडक कारवायांचा परिणाम आता दूध संकलनावरही दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दूध संकलनात सातत्याने घट होत असून, जुलैमध्ये जूनच्या तुलनेत तब्बल १ लाख १५ हजार २०० लिटरने दूध संकलन कमी झाले आहे. भेसळयुक्त दूध स्वीकारण्यावर संकलन केंद्रांमध्ये कडक निर्बंध आल्याने भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मे २०२६ मध्ये सुमारे २०.९१२ लाख लिटर, तर जूनमध्ये २०.६३४ लाख लिटर दूध संकलित झाले. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये हे संकलन १९.४८२ लाख लिटरवर आले. त्यामुळे एकाच महिन्यात सुमारे १.१५२ लाख लिटरची घट नोंदविण्यात आली आहे.

या घटेमागे केवळ भेसळविरोधी कारवाईच कारणीभूत नसून, हवामानातील बदल, पावसाची स्थिती आणि चाऱ्याची उपलब्धता यांचाही दूध उत्पादनावर परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून दिसते. मात्र, एफडीएच्या कारवाईमुळे कमी प्रतीचे अथवा भेसळयुक्त दूध स्वीकारण्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे.

फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीविरोधात झालेल्या कारवाईनंतर संपूर्ण दूध व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली. तपासणी आणि धाडी वाढल्याने दुधात पाणी किंवा अन्य घटक मिसळून त्याचे प्रमाण वाढविण्याच्या प्रकारांना आळा बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दूध संकलनातील घट ही शुद्धतेच्या दृष्टीने सकारात्मक परिणामाची नांदी ठरू शकते.

दरम्यान, राज्यातील विविध भागांत कृत्रिम दूध तयार करण्याच्या प्रकारांवरही कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील प्रकरणात मोठ्या प्रमाणावर बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा तपास पुढे आला असून, या प्रकरणात १३ आरोपींवर कारवाई करण्यात आली होती.

दूध भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रे, डेअरी, दूध विक्रेते आणि संबंधित व्यावसायिकांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईसोबतच ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित दूध उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सातत्याने मोहीम राबविण्याची गरज आहे.

एकूणच, एफडीएच्या धडक कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाच्या व्यवहाराला आळा बसण्याची चिन्हे दिसत असून, भविष्यात दूध संकलनातील आकडेवारीपेक्षा दुधाची गुणवत्ता आणि शुद्धता अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!