पिंपरी-चिंचवड : शहरात एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी घडली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करून संपूर्ण व्हॅनला वेढले. मात्र, सुदैवाने विद्यार्थ्यांना आधीच शाळेत सुरक्षितपणे सोडण्यात आले असल्याने व्हॅनमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना ‘इंदिरा शाळेत’ सोडल्यानंतर व्हॅन चालक वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान चालू व्हॅनमधून अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर काही क्षणांतच व्हॅनला मोठ्या प्रमाणात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण वाहनाला वेढले आणि व्हॅन जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच वाकड पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक शक्यता शॉर्टसर्किटची असली तरी शॉर्टसर्किटव्यतिरिक्त अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास वाकड पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेचा आणि नियमित वाहन तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने वाहनांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करणे आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.











