September 6, 2026 12:49 pm

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; अकॅडमी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आळेफाटा, ता. ११ : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आळेफाटा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा १० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. अकॅडमीतील शिक्षकाकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात अकॅडमीतील शिक्षक मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आळेफाटा येथे वास्तव्यास राहून पोलीस भरतीची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी तिचा एका मित्रासोबत वाद झाला होता. या प्रकरणामुळे अकॅडमीतील शिक्षक मयुर डुंबरे याला पोलिस ठाण्यात जावे लागल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिक्षकाकडून तरुणीला लक्ष्य करून वर्गात तसेच सरावाच्या वेळी इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे.

या त्रासाबाबत तरुणीने पोलीस दलात कार्यरत असलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला माहिती दिली होती. बहिणीने संबंधित शिक्षकाला फोन करून याबाबत जाबही विचारला होता. मात्र, त्यानंतरही पुन्हा तिचा सर्वांसमोर अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मानसिक त्रासातूनच तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाटील तपास करीत आहेत.

टीप : या प्रकरणातील शिक्षकावरील आरोप हे फिर्यादीत नमूद केलेले असून, त्यांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!