कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसोबत सेंद्रिय शेती तंत्रज्ञानासाठी पाच वर्षांचा करार
मंचर, ता. आंबेगाव : आफ्रिका खंडातील वाढती लोकसंख्या, मातीच्या आरोग्याचा ऱ्हास आणि भविष्यातील अन्नसुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन भारतीय सेंद्रिय शेती तंत्रज्ञान आफ्रिकेपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने मंचर येथील सेंद्रिय शेती तज्ज्ञ राहुल पडवळ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. युगांडातील कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (KIU) आणि पुण्यातील श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्यात सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शाश्वत शेतीसाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
राहुल पडवळ यांनी सुमारे दहा दिवसांच्या आफ्रिका दौऱ्यात KIUच्या कंपाला येथील मुख्य कॅम्पस तसेच पश्चिम युगांड्यातील ईशाका कॅम्पस येथे सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान, जागतिक अन्नसुरक्षा, शाश्वत शेती आणि मृदा आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानांना विद्यापीठातील व्यवस्थापन, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रशिक्षण, कार्यशाळा, पायलट प्रकल्प, उत्पादन विकास, सेंद्रिय कचऱ्याचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर, मृदा आरोग्य, परिपत्र अर्थव्यवस्था आणि हवामान अनुकूल शेती अशा विविध क्षेत्रांत काम केले जाणार आहे.
आफ्रिकेतील उपलब्ध नैसर्गिक जैवभार आणि भारतातील सेंद्रिय शेती तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य सुधारण्यासोबतच अन्नधान्य उत्पादन वाढविणे शक्य आहे. तसेच या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना मिळू शकते, असा विश्वास राहुल पडवळ यांनी व्यक्त केला.
‘सेंद्रिय कचरा ही समस्या नसून भविष्यातील संपत्ती’
“सेंद्रिय कचरा ही समस्या नसून भविष्यातील संपत्ती आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे उच्च दर्जाच्या सेंद्रिय खतांमध्ये रूपांतर केल्यास मृदा आरोग्य, अन्नसुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविता येतील. भारत-युगांडा सहकार्याच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आफ्रिकेतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,” असे राहुल पडवळ यांनी सांगितले.
या वेळी कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. मोहम्मद एंगोमा, उपकुलगुरू प्रा. रेजींना एजेंमोट एंवादीरो, डॉ. मुंडू मुस्तफा, डॉ. जेकब अशबिरी, संचालक प्रा. डॉमिनिक बायरुगाबा, विद्यापीठाचे संचालक मंडळ, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या सामंजस्य कराराची माहिती कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनेही प्रसारित केली आहे.











