पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : अन्न व औषध प्रशासनाने पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तपासणीमध्ये काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई केली.
दरम्यान, कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना वाहतूक केला जात असलेला सुमारे ५९८ किलो मावा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला. या माव्याची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती आहे.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापना
- द लोटस रिसॉर्ट, मोरवे, लोणावळा
- द मसल फूड्स (बेकरी), बिबवेवाडी
- हुमा बेकरी, गणेशनगर, पिंपरी-चिंचवड
- न्यू महाराष्ट्र बेकर्स, दत्तनगर रस्ता, आंबेगाव बुद्रुक
- मारकेश व्हेंचर्स, पर्वती, सहकारनगर
- स्विन्स्टा ईएनटी, वारजे जकात नाका, कर्वेनगर
अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध भागांमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता, स्वच्छता आणि परवान्यांची नियमित तपासणी सुरू आहे. अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील सर्व नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
— अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र











