September 5, 2026 10:37 am

महिलांची बैठक लावण्यावरून वाद; पहाटे तुळजाभवानी कला केंद्रात गोळीबार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गोळी कमरेला घासून गेल्याने तरुण जखमी; नारायणगाव पोलिसांकडून तपास सुरू

रायणगाव : पिंपळवंडी परिसरातील कांदळी ग्रामपंचायत हद्दीत, पुणे–नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रात पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. महिलांची बैठक लावण्यावरून झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत ओतूर येथील फिरोज कादिर शेख (वय 31) हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकण परिसरातील चार तरुण तुळजाभवानी कला केंद्रात आले होते. या तरुणांनी मद्यपान केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास महिलांची बैठक लावण्यावरून त्यांचा स्थानिक कामगारांशी वाद झाला. परिस्थिती वाढत असल्याने संबंधित तरुणांना कला केंद्रातून बाहेर काढण्यात आले.

यानंतर कला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा वादाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी चाकण येथील चार तरुणांपैकी एका तरुणाने पिस्तुलातून जमिनीच्या दिशेने गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबारातील एक गोळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ओतूर येथील फिरोज कादिर शेख यांच्या कमरेला घासून गेली. त्यामुळे ते जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली.

जखमी फिरोज शेख यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या दुखापतीबाबत पुढील वैद्यकीय माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयित तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक चाकण परिसरात रवाना करण्यात आले आहे. संशयितांचा शोध घेऊन घटनेमागील नेमके कारण, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. संबंधित कला केंद्रात यापूर्वीही वादाच्या घटना घडत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न करता कला केंद्र उशिरापर्यंत सुरू असल्याची माहितीही स्थानिकांकडून दिली जात आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृतपणे पोलीस चौकशी होणे बाकी आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संशयित व्यक्ती ताब्यात आल्यानंतर घटनेचे नेमके कारण आणि गोळीबाराची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!