September 6, 2026 2:51 pm

पुण्यात दुचाकीला टेंपोची धडक; खुबीच्या २६ वर्षीय संशोधक युवतीचा जागीच मृत्यू, एका अपघाताने संपले स्वप्न

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे / रेठरे बुद्रुक | प्रतिनिधी

पुण्यातील एका भीषण रस्ते अपघातात सातारा जिल्ह्यातील खुबी येथील २६ वर्षीय संशोधक युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. श्रद्धा राजाराम माने (वय २६) असे मृत युवतीचे नाव असून, तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा माने या पुण्यातील निगडी परिसरात वास्तव्यास होत्या. मंगळवारी दुपारी त्या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव टेंपोने जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अपघाताचे नेमके कारण आणि टेंपो चालकाची जबाबदारी याबाबत संबंधित पोलीस अधिक तपास करत आहेत.

श्रद्धा माने या मूळच्या सातारा जिल्ह्यातील खुबी गावातील रहिवासी होत्या. त्यांचे वडील राजाराम जालिंदर माने हे कृष्णा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवतात. अत्यंत अभ्यासू आणि जिद्दी असलेल्या श्रद्धा यांनी एम.एस्सी. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील निगडी येथील एका अशासकीय संशोधन संस्थेत संशोधक म्हणून नोकरी स्वीकारली होती. विज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या मेहनतीने कार्यरत होत्या.

मात्र, एका क्षणात झालेल्या भीषण अपघाताने त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नेही कायमची अपूर्ण राहिली. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही शोककळा पसरली आहे.

बुधवारी पहाटे खुबी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजोबा आणि भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जनाचा विधी शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता खुबी येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

या दुर्घटनेमुळे पुणे शहरातील वाढत्या रस्ते अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!