पिंपरी | प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईला वेग देत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल १५० कोटी रुपयांच्या आंतरराज्य सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य ‘म्युल अकाउंट’ पुरवठादाराला अटक केली आहे. ऑनलाइन गुंतवणूक (Investment Fraud) आणि टास्क फ्रॉडच्या आमिषाने देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीशी संबंधित आरोपीच्या नऊ बँक खात्यांमधून १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, वाहनचोरीविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबवत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४० दुचाकी, २४ मोबाईल जप्त करत २४ गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
१५० कोटींच्या सायबर रॅकेटमधील मुख्य आरोपी गजाआड
आळंदी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने केलेल्या कारवाईत सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) याला अटक करण्यात आली. गोडाऊन चौक, मोशी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. आळंदी येथील एका बँकेच्या शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
तपासात सचिन काळे याने स्वतःच्या नावावर वेगवेगळ्या नऊ बँकांमध्ये खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये फसवणुकीतून आलेली रक्कम जमा होत होती. त्यानंतर आरोपी एटीएम आणि धनादेशाच्या माध्यमातून पैसे काढून पुढे संबंधित टोळीपर्यंत पोहोचवत होता.
६५ नागरिकांची १५० कोटींची फसवणूक
नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वरील माहितीनुसार, या आंतरराज्य सायबर रॅकेटने देशभरातील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीच्या खात्यांमधून १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांना पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
सायबर गुन्हेगार विविध आर्थिक आमिषे दाखवून नागरिकांची बँक खाती, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड भाड्याने घेतात किंवा वापरतात. अशा खात्यांमधून फसवणुकीची रक्कम फिरवली जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड वापरासाठी देऊ नये. तसेच अनोळखी व्यक्तीकडून आलेली रक्कम काढून देणे किंवा तिची देवाणघेवाण करणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो, असा इशारा पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिला आहे.
दुचाकी आणि मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद
दुसऱ्या कारवाईत बावधन पोलिसांनी दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर गस्तीदरम्यान पोलिसांना संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणारा एक तरुण दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्या चौकशीतून अनिल लहू जाधव (२०), वसंत अंकुश जाधव (२५), सुनील लहू जाधव (२५) आणि एका अल्पवयीन साथीदाराचा सहभाग समोर आला.
या कारवाईत वाकड पोलीस ठाण्यातील चार, हिंजवडीतील दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारी टोळी अटकेत
वाहनचोरीविरोधातील आणखी एका मोठ्या कारवाईत वाकड पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (४६), वेदप्रकाश मदनसिंग रावत (३५) आणि संतोष मोहन मांगीलवाड (२८) यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी ज्ञानेश्वर जैसवाल हा बदली चालक म्हणून काम करत असून केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गरज संपल्यानंतर तो चोरीची दुचाकी कुठेही सोडून देत असे आणि पुढे गरज भासल्यास दुसरी दुचाकी चोरत असे.
या तपासातून वाकड, आळंदी, चाकण, संत तुकारामनगर, शिक्रापूर तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपीकडून मिळालेल्या आठ दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर गुन्हे तसेच वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बँक खाते, एटीएम, सिमकार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नयेत. तसेच वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करून लॉक करावे, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











