August 5, 2026 12:13 pm

दौंडमध्ये तरुणीचे मध्यरात्री अपहरण; माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर अपहरण, दरोडा, विनयभंगासह गंभीर गुन्हे दाखल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दौंड | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्री सशस्त्र टोळक्याने एका तरुणीच्या घरात घुसून तिचे अपहरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यासह ११ जणांविरुद्ध अपहरण, दरोडा, विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

मध्यरात्री घरात घुसून अपहरण

फिर्यादीनुसार, २८ जुलैच्या मध्यरात्री संशयित आरोपी हातात तलवारी, कोयते आणि पिस्तूल घेऊन संबंधित तरुणीच्या घरात घुसले. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी दहशत निर्माण केली. आरोपींनी तरुणीच्या आईला मारहाण केली तसेच तिच्या डोक्याला पिस्तूल लावून विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी घरातील कपाट उघडून रोख रक्कम लुटली. तसेच तरुणीच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. याचदरम्यान जातीवाचक शिवीगाळ करत आरोपींनी संबंधित तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर ओढत नेले आणि पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई वेर्ना कारमध्ये बसवून घटनास्थळावरून फरार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बादशहा शेखसह ११ जणांवर गुन्हा

या प्रकरणात नदीम अन्वर शेख, बादशहा आदम शेख (माजी नगराध्यक्ष), शफीक मुलाणी, इरफान उर्फ वसीम अन्वर शेख, फैजल मेहफूज काझी, अशपाक समीर शेख, आफताब समीर शेख, आरबाज अन्वर शेख आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, नदीम शेख याने फिर्यादी महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले, तर इतर आरोपींनी घरात घुसून लूटमार आणि अपहरणाच्या घटनेत सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेतील कलम १४० (अपहरण), कलम ३१० (दरोडा), कलम ३३२ (घरात बेकायदेशीर प्रवेश), कलम ३५१ (जीवे मारण्याची धमकी), कलम ७४ (विनयभंग) यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास दौंड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

बादशहा शेख यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे

या प्रकरणातील प्रमुख आरोपी बादशहा शेख यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका तरुणीचा विनयभंग करून तिच्यासह कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

याशिवाय, त्यांच्या मुलगा वसीम शेख याला बलात्काराच्या प्रकरणात मदत केल्याचा आरोपही बादशहा शेख यांच्यावर असून, त्या प्रकरणात त्यांच्यासह सहा जणांविरुद्ध ८ डिसेंबर २०२२ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत

बादशहा शेख हे यापूर्वी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत आले होते. २७ जून २०२५ रोजी दौंड पोलिस ठाण्यासमोर आयोजित आंदोलनादरम्यान त्यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधातही त्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी २८ जून २०२५ रोजी अहिल्यानगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरात खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

मध्यरात्री घडलेल्या या अपहरण, दरोडा आणि शस्त्रांचा धाक दाखवत केलेल्या गुन्ह्यामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू केला असून, सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!