पुणे | प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख वसंत मोरे यांना पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांना स्वारगेट पोलिस चौकीत नेण्यात आले. या घटनेनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विरोधी पक्षांकडून या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पोलिसांनी कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले, याची माहिती देतानाच आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि समर्थकांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.
दरम्यान, पुण्यातील महर्षी नगर येथील महाराष्ट्र मंडळ मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाने यापूर्वीच दिला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरभर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रात्रीपासूनच प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले. तरीही काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या ताफ्याच्या मार्गावर काळे फुगे सोडून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड चौकात आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही काळ रस्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली आणि परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, कार्यक्रमस्थळी तसेच दौऱ्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. विविध राजकीय संघटनांकडून आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, वसंत मोरे यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आगामी काळात या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांची भूमिका आणि प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार असून, पुण्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.











