शिक्रापूर, प्रतिनिधी : शेजारधर्म, विश्वास आणि आपुलकी या नात्यांनाच तडा देणारी धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. घरातील कुटुंबीय दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच एका सराईत चोराला पुरवल्यामुळे बंद घरावर डल्ला मारण्यात आला. या चोरीत तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या घरफोडीचा पर्दाफाश करत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरूर तालुक्यातील ढेरंगेवस्ती येथे राहणारे किरण पंडित ढेरंगे हे आपल्या कुटुंबासह नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संपूर्ण माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान वस्तूंची झडती घेतली. यामध्ये सोन्याचे गंठण, चेन, कानातील दागिने, डोरले तसेच इतर दागिन्यांसह सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके (रा. कात्रज, पुणे) याचा या घरफोडीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यामुळे फिर्यादी कुटुंबाला त्यांचा मौल्यवान ऐवज पुन्हा मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले. घराशेजारी राहणारा दिपक बाळासाहेब ढेरंगे (रा. ढेरंगेवस्ती, कोरेगाव भीमा) यानेच फिर्यादी कुटुंब बाहेरगावी गेल्याची माहिती आरोपीला दिली होती. घर बंद असल्याची खात्री करून देत घरातील हालचालींची माहिती त्याने आरोपीपर्यंत पोहोचवली. या माहितीच्या आधारेच घरफोडीचा कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. शेजारी म्हणून असलेला विश्वासघातच या गुन्ह्यामागील प्रमुख कारण ठरल्याचे उघड झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे तसेच गुन्हे शोध पथकातील लहानू बांगर, श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून ही कारवाई यशस्वी केली.
शिक्रापूर पोलिसांनी अत्यल्प कालावधीत गुन्ह्याचा छडा लावत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने त्यांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर प्रभावी धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही घर बंद ठेवताना शेजाऱ्यांवर अंधविश्वास न ठेवता आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.











