शेरे परिसरात हळहळ; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कराड | सकलेन मुलाणी
नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने तणावात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील शेरे परिसरात घडली. समीक्षा दीपक पवार (वय १८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, समीक्षाने मागील वर्षी नीट परीक्षा दिली होती. परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने ती काही काळापासून मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिच्या या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
२३ जुलै रोजी समीक्षाने विषारी पदार्थाचे सेवन केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरुवातीला तिने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. दोन दिवसांनंतर प्रकृती बिघडून पोटदुखीचा तीव्र त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
कुटुंबीयांनी तिला २६ जुलै रोजी तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि घटनेमागील परिस्थितीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती आहे.
स्पर्धा परीक्षांतील अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. अशा परीक्षांमधून अपेक्षित निकाल न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःला दोष न देता पालक, शिक्षक, मित्र किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी संवाद साधणे आवश्यक आहे. पालकांनीही मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या भावनिक स्थितीकडे संवेदनशीलतेने लक्ष देण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
टीप : आत्महत्येशी संबंधित विचार येत असल्यास एकटे राहू नका. विश्वासू व्यक्ती, कुटुंबीय किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी तातडीने संवाद साधा.











