July 27, 2026 5:13 pm

पुणे शहरातील अनेक भागांचा ३० जुलै रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद; ३१ जुलैला उशिरा व कमी दाबाने पाणी, नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि संबंधित पंपिंग स्टेशन येथे विद्युत व यांत्रिक यंत्रणेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार, ३० जुलै रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. या कामाचा परिणाम दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, ३१ जुलै रोजीही जाणवणार असून सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह खडकवासला धरण परिसरात सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने गेल्या महिन्यात लागू केलेली दिवसाआड पाणीपुरवठ्याची योजना रद्द करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी लष्कर जलशुद्धीकरण केंद्रातील तसेच पंपिंग स्टेशनमधील अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, लष्कर जलशुद्धीकरण केंद्र, रामटेकडी, वानवडी १२५, बकरी हिल, हाय सर्व्हिस, कॅम्प, रेसकोर्स आणि ठाकरसी टाक्यांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरांसह लष्कर ते खराडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांमध्ये दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

दुरुस्तीच्या कामामुळे काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी, वैदुवाडी, भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर, हडपसर, माळवाडी, मुंढवा, मगरपट्टा सिटी, केशवनगर, साडेसतरा नळी, म्हसोबा नगर, काळेबोराटेनगर, हांडेवाडी रोड, भुजबळ वस्ती, वानवडी गावठाण, चौगुलेमळा, शितळादेवी मंदिर परिसर यांसह अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, उंड्री रोड, आझादनगर, शांतीनगर, केदारीनगर, काकडे मैदान परिसर, मानेवस्ती, जांभूळकर वस्ती, जगताप चौक, विकासनगर, शिंदे छत्री परिसर, संविधान चौक ते गंगा सॅटेलाईट चौक, सिद्धार्थ नगर, ब्रम्हा काउंटीज, कोणार्क इंद्रायू या भागांनाही पाणीपुरवठा होणार नाही.

बी.टी. कवडे रोड, घोरपडी, भीमनगर, भारत फोर्ज परिसर, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, एस. व्ही. नगर, लक्ष्मीनगर, डांबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प, कमांड हॉस्पिटल, एम. जी. रोड, इस्ट स्ट्रीट, मोदीखाना आदी परिसरांनाही या बंदचा फटका बसणार आहे.
तसेच कोरेगाव पार्क, येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता नगर, मदर तेरेसा वसाहत, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, नेताजी नगर, गांधीनगर, कश्मीर कॉलनी, भीमाशंकर वसाहत, यशवंत नगर, संगमवाडी, नगर रोड, कल्याणीनगर या भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

खराडी गावठाण, ईऑन आयटी पार्क परिसर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, महावीर नगर आणि आसपासच्या परिसरालाही पाणीपुरवठा मिळणार नाही.

दुसऱ्या दिवशीही परिणाम
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ही दुरुस्ती आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!