July 25, 2026 11:25 am

प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारताना बारामती एमआयडीसी डेपोतील वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारामती : प्रलंबित बिले आणि ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी लाखो रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या बारामती एमआयडीसी डेपोतील वाहतूक नियंत्रकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे पथकाने रंगेहात पकडले. सुरुवातीला सहा लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर चार लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिवहन विभागासह सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारामती एमआयडीसी डेपो येथे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले अनिल तुकाराम बनकर (वय ५१) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बनकर हे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फर्निचर व्यवसायिक असून त्यांच्या फर्ममार्फत स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीसाठी फर्निचरचे काम करण्यात आले होते. या कामाची एकूण किंमत ४८ लाख ६० हजार ४५५ रुपये इतकी होती. त्यापैकी ४० लाख रुपये अदा करण्यात आले होते. मात्र, फर्निचरच्या कामाचे ८ लाख ६० हजार ४५५ रुपये तसेच इतर कामांचे ४ लाख ९८ हजार रुपये अशी मोठी रक्कम अद्याप प्रलंबित होती. याशिवाय ठेव रक्कमही मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रलंबित बिले आणि ठेव रक्कम वरिष्ठ स्तरावर मंजूर करून देण्यासाठी आरोपी अनिल बनकर यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीकडून करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान त्यांनी सहा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे दोघांमध्ये तडजोड होऊन चार लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराने लाच देण्यास स्पष्ट नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संतोष बुधा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची गोपनीय पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. यानुसार २३ जुलै रोजी बारामती शहरात विशेष सापळा रचण्यात आला. बारामती एस.टी. बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावरील परिसरात आरोपी अनिल बनकर यांनी त्यांच्या ताब्यातील इर्टिगा (एमएच-४२-बीई-५७८७) या वाहनामध्ये पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तडजोडीनुसार चार लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एसीबीने चार लाख रुपयांची लाचेची रक्कम, मोबाईल फोन, संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच अन्य महत्त्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची पुढील चौकशी सुरू आहे. सार्वजनिक कामांमध्ये लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने अशा कारवाया करण्यात येत असून, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!