एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी प्रकरणात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; न्यायालयाने सुनावली १० दिवसांची पोलिस कोठडी
पुणे : गुंतवणूकदारांना अल्पावधीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून भारतात प्रत्यार्पित करण्यात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे. मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे राज्यातील गाजलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा राठोड आणि इतर साथीदारांनी बाणेर येथील एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना जादा नफ्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे समोर आले. तपासात आरोपींनी गुंतवणूकदारांशी केलेल्या कराराचे उल्लंघन करून फिर्यादीची ८६ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच इतर गुंतवणूकदारांचे मिळून सुमारे ८८ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड हे परदेशात फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्याविरोधात ‘लुक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले. त्याचबरोबर विशेष एमपीआयडी न्यायालयाने दोघांविरोधात अटक वॉरंट आणि जाहीर नोटीसही काढली. पोलिसांनी या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून आरोपीचा पासपोर्टही निलंबित करण्यात आला होता. तपासाची व्याप्ती वाढवत आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या समन्वयाने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४ जून २०२६ रोजी अविनाश राठोड आणि विशाखा राठोड यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली. या नोटिशीच्या आधारे यूएई प्रशासनाने अविनाश राठोड याला ताब्यात घेतले आणि २३ जुलै २०२६ रोजी भारताकडे प्रत्यार्पित केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १० दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने देश-विदेशातील विविध यंत्रणांच्या मदतीने उर्वरित आरोपींनाही भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीचे मार्ग, अपहार झालेल्या निधीचा वापर आणि इतर संभाव्य लाभार्थी यांचाही सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे आर्थिक गुन्हे करून परदेशात आश्रय घेणाऱ्या आरोपींवर कायद्याचा बडगा उगारण्याचा पोलिसांचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला असून, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या प्रकरणातून देण्यात आला आहे.
Post Views: 6










