मिरा रोड येथील एका गृहसंकुलात बकरी आणण्यावरून सुरू झालेला वाद आता हळूहळू हिंसक वळण घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित सोसायटी परिसरात आंदोलन करत डुक्कर नेण्याचा प्रयत्न केला तसेच हनुमान चालीसा पठण आणि घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरा रोड येथील पुनम क्लस्टर या उच्चभ्रू गृहसंकुलात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही रहिवाशांनी संकुलात बकऱ्या आणून ठेवल्याचे समोर आले होते. यावर काही रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांनी सोसायटीबाहेर आंदोलन केले होते. त्यावेळी परिस्थिती काही काळ नियंत्रणात आली होती. मात्र आंदोलनकर्त्यांची एका मुस्लिम व्यक्तीसोबत बाचाबाची झाली. संबंधित व्यक्तीने ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे वातावरण अधिकच तापले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती.
मात्र मंगळवारी पुन्हा हा वाद पेटला. संकुलात आणलेल्या बकऱ्यांना बाहेर काढण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. सकाळपासूनच सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तीन डुक्कर आणून संकुलात नेण्याचा प्रयत्न केला. तसेच जय श्रीरामच्या घोषणा देत हनुमान चालीसा पठण करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर संकुलातील बकऱ्या बाहेर काढण्यासाठी वाहने बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.










