औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीला बसला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील नियोजित प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदाच्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.
विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक भरतीसाठी आगामी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित नियोजित मुलाखतींच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी तातडीची व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावली होती. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्यासह १५ सदस्यांनी हजेरी लावली.
या बैठकीत दोन विषयांना मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. त्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषद सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षक संवर्गाच्या नियोजित मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुलाखती आता २६ जूननंतर घेण्यात येणार आहेत. या मुलाखतींमध्ये विधि, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतिशास्त्र, इतिहास, इंग्रजी आणि हिंदी विभागातील प्राध्यापक वर्गातील एकूण ८ पदांसाठी व सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या ६५ जागांचा समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितले.
२२ मे रोजी कुलसचिव पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीस ८ पैकी केवळ ३ उमेदवारांनी हजेरी लावली. यापैकी एकाही उमेदवाराची निवड समितीने केलेली नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहिले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या पदासाठी जाहिरात देऊन पुन्हा नव्याने अर्ज मागविण्याचा निर्णयही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.











