June 5, 2026 7:54 am

नीट’ची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानला, 150 प्रश्नांसाठी 10 लाखांचा सौदा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘नीट’ची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल्स गुरुग्राममार्गे राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये १५० प्रश्नांसाठी १० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.सीबीआयच्या माहितीनुसार, पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्याकडून नीट परीक्षेशी संबंधित साहित्य आरोपी धनंजय निवृत्ती लोखंडे याच्याकडे आले. त्यानंतर लोखंडे याने हे साहित्य शुभम मधुकर खैरनार याला दिले. पुढे २९ एप्रिल २०२६ रोजी शुभम खैरनार याने टेलिग्रामवरून लीक प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल्स गुरुग्राममधील यश यादव याला पाठवल्या. यश यादव याने पुढे ही प्रश्नपत्रिका राजस्थानमधील मंगीलाल खटीक याच्यापर्यंत पोहोचवली. मूळ प्रश्नपत्रिकेतील सुमारे १५० प्रश्न जुळल्यास १० लाख रुपयांचा सौदा ठरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर मंगीलाल खटीक याने प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढून आपल्या मुलासह इतर विद्यार्थ्यांना त्या वितरित केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

तपासादरम्यान मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांच्यातील संबंधही उघड झाले आहेत. प्रल्हाद कुलकर्णी हे नीट-यूजी २०२६ प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित विषयतज्ज्ञ होते. तर मनीषा मांढरे या एनटीएच्या विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. अंतिम प्रश्नसंचाचा प्रवेश मिळाल्यानंतर निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे.

पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात भोगवटापत्राविना सुरू असलेल्या आर. सी. सी मोटेगावकर क्लासला अखेर महापालिकेने बुधवारी टाळे ठोकले. जंगली महाराज रस्त्यावर डेक्कन जिमखाना बस स्थानकासमोरील बोरावके इमारतीमध्ये ‘आरसीसी मोटेगावकर क्लास’ बेकायदा चालवला जात होता. या इमारतीला भोगवटापत्र नसताना वापर केला जात आहे, तक्रार दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेकडे केली होती. मात्र, या नंतरही दोन महिने महापालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने या क्लासला टाळे ठोकण्याचा आणि आठ दिवसांत पुढील कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिले.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक मनीषा वाघमारे आणि मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना घेऊन पुण्यात दाखल झाले असून, ‘सीबीआय’च्या पथकाने पुणे पोलिसांकडे मोठा बंदोबस्त मागितला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘सीबीआय’ने मनीषा मांढरे यांच्या महाविद्यालयातील वैयक्तिक लॉकरची झडती घेतल्यानंतर मोठे धागेदोरे मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत पुण्यातून ब्यूटी पार्लर चालक मनीषा वाघमारे, ‘आरसीसी’ क्लासचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर आणि दिल्लीतून मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक केली आहे. सर्व संशयित सध्या सीबीआय कोठडीत असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने मॉडर्न महाविद्यालयात जाऊन मांढरे यांच्या लॉकरची तपासणी केली. या झडतीदरम्यान काही जुन्या प्रश्नपत्रिका; तसेच महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याचे समजते. या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी ‘सीबीआय’चे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या प्रकरणातील सर्व घटकांची कसून तपासणी केली जात आहे. मंगळवारी रात्री लातुरातील औसा रस्त्यावरील एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची ‘सीबीआय’च्या पथकाने चौकशी केली. आणखी दोन डॉक्टरांची तपासणी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाचीही तपासणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. ‘सीबीआय’च्या पथकाने बुधवारी काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली असून, एका वसतिगृहात राहणार्‍या एका विद्यार्थ्याची चौकशी करून त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या निकालावरही शंका व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!