June 5, 2026 6:01 am

नाल्यातील गाळात रिक्षाचा सांगाडा, फ्रीज, सोफा, लाकडी वस्तू; बेजबाबदार नागरिकांवर कारवाईची मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पावसाळा तोंडावर आल्याने महानगरपालिकेने नालेसफाईसाठी कंबर कसली आहे. मात्र, नाल्यातील गाळात प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, घरगुती कचरा, फ्रीज, सोफा, अन्य लाकडी वस्तू, भंगार, कपडे आदी गोष्टी आढळून येत आहेत.

साकीनाका येथे सुरू असलेल्या नालेसफाईदरम्यान चक्क रिक्षाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला. त्यामुळे नाल्यात कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महापालिका प्रशासनाने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नालेसफाईला वेग दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने नालेसफाईचे दौरे केले जात असून कामांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकण्यात येत असलेला कचरा मोठी समस्या बनली आहे. नालेसफाईनंतरही अनेक नाल्यांमध्ये पुन्हा तरंगता कचरा दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने ओळखून नाल्यांमध्ये कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन दरवर्षी महापालिकेकडून केले जात आहे. असे असले तरीही नाल्यांमध्ये घरगुती कचरा टाकण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत.

कुर्ला, मानखुर्द, गोवंडी आणि देवनार परिसरातील नाल्यांमध्ये घरगुती वापराच्या मोठ्या वस्तू आढळून आल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. साकीनाका येथील सत्य नगर पाइप लाईन भागातील सफेद पूल नाल्यातून गाळ उपसण्यात येत असताना सोमवारी त्या रिक्षाचा सांगाडा सापडला. तसेच, प्रभाग क्रमांक १६४ मधील संजय नगर नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा आढळून आला. संत निरंकारी नाल्यात मंगळवारी विविध घरगुती वस्तू, हातगाडी, औद्योगिक कचरा टाकण्यात आल्याचेही आढळून आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची शक्यता आहे. अनेक नाल्यांशेजारचा भाग अनधिकृत वस्त्या आणि दुकानांनी व्यापला आहे. स्थानिक राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मतपेढी हे त्यामागील प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!