सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे.जयंत पाटलांचे दोन खंदे नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश केला.. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी पक्षांतर केली. निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. सांगली आज मोठी घडामोड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांना भाजपनं मोठा धक्का दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अवघे तीन नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडून आले होते, त्यापैकी दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटलांनी,भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत करेक्ट कार्यक्रम केला होता.
त्याची परतफेड म्हणून महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत जयंत पाटलांना दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युवराज शिवाजीराव गायकवाड हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक १९ शासकीय वसाहत, वानलेसवाडी दक्षिण भागेचे प्रतिनिधित्व करतात. तर सुरेश बंडगर हे १९ वार्ड बचे प्रतिनिधित्व करतात.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूला ढकलत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय शह दिल्याचे बोलले जात होतं. सांगलीच्या राजकारणात हा विजय जयंत पाटील यांच्या रणनीतीचा मोठा नमुना मानला जात होता. मात्र आता त्याच डावाला प्रत्युत्तर देत चंद्रकांतदादांनी ‘जशास तसे’ उत्तर दिलंय.
दरम्यान आज शरद पवार गटाच्या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एक्सवरून दिली. सोशल मीडियावर पोस्ट करत चव्हाण म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर आणि नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सांगली महापालिकेतील निवडणुकीत शरद पवार गट आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. कारण महापालिकेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. जरी सांगलीत भाजप मोठा पक्ष ठरला होता, तरी त्यांना बहुमत मिळवता आलं नव्हतं.











