अहिल्यानगर येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळावर एका ६९ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. राजेंद्र बाबुराव घायतिडक (वय ६९, सध्या रा.पलूस, मूळ रा. प्रकाशनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून किरकोळ वादातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजेंद्र घायतिडक हे मूळचे प्रकाशनगर येथील रहिवासी असून कौटुंबिक कारणांमुळे ते पलूस येथे मुलीकडे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी ते संजयनगर येथील दुसऱ्या मुलीकडे आले होते. रविवारी रात्री ते वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळ परिसरात गेले होते. याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या तीन अल्पवयीन मुलांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातील एक मुलगा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून संतप्त झालेल्या तिघांनी जवळील दगड उचलून घायतिडक यांच्या डोक्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मध्यरात्री घडलेली ही घटना कोणाच्याही निदर्शनास आली नाही. आज सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप भागवत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या.
संजयनगरचे पोलिस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांचा शोध घेत अवघ्या काही तासांत तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून या हत्येमागे अन्य कोणते कारण होते का, याचाही तपास सुरू असून अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे.











