June 5, 2026 5:09 pm

महापालिकेत शासकीय अधिकाऱ्यांचा भरणा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महापालिकेत राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारांबरोबरच पदोन्नतीच्या संधींवरही परिणाम होत असल्याची चर्चा प्रशासनात सुरू झाली आहे.

सध्या महापालिकेत तब्बल ३२ शासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने सर्वसाधारण सभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

नगरसेविका दीपाली डोख यांनी महापालिकेत किती शासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत, तसेच काही अधिकारी आदेशानंतरही अन्य ठिकाणी रुजू होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या उत्तरानुसार, महापालिकेत एक महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त, दहा उपायुक्त,अकरा सहाय्यक आयुक्त, एक मुख्य लेखापरीक्षक, एक आरोग्य प्रमुख, एक शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग), एक प्रशासकीय अधिकारी, एक उपसंचालक नगर रचना, एक नगर रचनाकार आणि एक प्रशासन अधिकारी असे एकूण ३२ अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

महापालिकेतील उपायुक्तांच्या एकूण १८ पदांपैकी नऊ पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात सध्या दहा उपायुक्त कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि महत्त्वाच्या पदांवरील संधी कमी होत असल्याची भावना प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त पदांपैकी किमान एक पद महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठता आणि बढतीच्या आधारावर मिळणे अपेक्षित असताना, सध्या तीनही अतिरिक्त आयुक्त हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आहेत. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बढतीची संधी हुकल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.

दरम्यान, काही अधिकारी विशिष्ट विभागातच कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न करतात आणि आदेशानंतरही अन्य विभागात रुजू होत नाहीत, असा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत सर्व अधिकारी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार नियुक्त ठिकाणी कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!