May 15, 2026 2:25 pm

आदिवासी समाजातील सपना वाघमारेची दुर्गम पाड्यातून थेट सातासमुद्रापार भरारी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या सपना राजेश वाघमारे या विद्यार्थिनीने शिक्षणासाठी दुर्गम पाड्यातून थेट सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. कायद्याच्या पदव्युत्तर (एलएमएम) शिक्षणासाठी तिचा युनायटेड किंगडममधील जागतिक स्तरावरील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स व क्वीन मेरी युनिव्हर्सिटी या दोन नामांकित विद्यापीठांतील प्रवेश निश्चित झाला आहे.

सपना ही आदिवासी कातकरी समाजातील असून रायगड जिल्ह्यातील कोलाड सारख्या एका दुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. जागतिक स्तरावर झेप घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने कायद्याची पदवी (बीएएलएलबी) प्राप्त केली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि अनेक अडचणींवर मात करीत तिने हे यश संपादन केले आहे.

मोलमजुरी करून मुलीला शिक्षण देणाऱ्या तिच्या पालकांसाठी तसेच आदिवासी विकास विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली असल्याची भावना वसतीगृहातील सहकारी विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केली.

हे वसतिगृह राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या “ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्राम” अंतर्गत कार्यरत आहे. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वसतिगृह प्रशासन, गृहपाल आणि एकलव्य फाउंडेशन यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक सहकार्यामुळेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले असल्याचे सपनाने यावेळी सांगितले.

प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई म्हणाले, ‘आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. सपना हिचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील.’

वसतिगृहाच्या गृहपाल अर्चना पवार म्हणाल्या, ‘वसतिगृह हे केवळ निवासाचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. तिचे हे यश सर्व विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे.’

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!