May 14, 2026 5:47 pm

ताडमाळ, मुहमाळ गावात भीषण पाणीटंचाई

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाडा तालुक्यात नद्यांचे जाळे भक्कम असूनही नियोजनाचा अभाव लोकांच्या समस्यांचे कारण बनले आहे. जलजीवन मिशन योजना बासनात गुंडाळण्याची वेळ आली असून तहानेने व्याकुळ जनता अधिक मेटाकुटीला आली आहे.

तालुक्यातील सर्वात दुर्गम मानल्या जाणाऱ्या ताडमाळ व मुहमाळ गावात आधीच रस्त्याची समस्या असून पाण्यासाठी करावा लागणार आटापिटा जीवघेणा बनला आहे. टँकर मंजूर असूनही टँकर मिळत नसल्याने जनता संतप्त झाली असून प्रशासन हतबल झाल्याचे बघायला मिळत आहे.

गावात पक्का रस्ता नाही, विजेची सोय बेभरवशाची, रोजगाराची बोंबाबोंग, शिक्षण व आरोग्य व्यवस्थांची अबाल अशी अवस्था असणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत ताडमाळ व मुहमाळ गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई तशी या गावाच्या पाचवीला पुंजलेली असून पाण्यासाठी विहिरींच्या व्यतिरिक्त कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. ताडमाळ गावाची 138 लोकसंख्या असून गावातील विहिरीत खडखडाट आहे. जवळपास 500 मीटर अंतरावर विहिरीत कोरड भागवायला पाणी आहे मात्र त्यासाठी मोठी चढाई पार करावी लागते.

रिकाम्या हाताने विहिरीवर जाऊन यायचे म्हटले तरी उभा दम लागतो मात्र येथील महिलांना डोक्यावर तीन हांडे घेऊन करावी लागणारी चढाई त्यांच्यातील शौर्य दाखविणारे आहे. गावातील विहिरीचे खोदकाम करून त्यावर लघु योजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी सुरेश कोदे यांनी केली आहे.

242 लोकसंख्या असणाऱ्या मुहमाळ गावात हीच परिस्थिती असून गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील लोकांनी अतिशय खोल असणाऱ्या एका विहिरीचे नव्याने खोदकाम केल्याने त्यात पिण्याइतके पाणी मिळते मात्र विहिरीतून पाणी काढताना दमछाक होत असून मे अखेरीस परिस्थिती बिकट होते असे स्थानिक नागरिक रवींद्र घाटाळ यांनी सांगितले.

संतापजनक बाब म्हणजे या दोन्ही गावांमध्ये पाण्याचा टँकर मंजूर झाला आहे मात्र कंत्राटदार पाणी पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका जनतेला सहन करावा लागत असून तात्काळ पाण्याचा टँकर रोज सुरू करावा अशी मागणी लोकांनी केली आहे. गावात जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून वन विभागाच्या कचाट्यातून या योजनेची सुटका होणे आता धुरस झाल्याने लोकांना पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

जयकुमार जाधव, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग वाडा. गावात जाणारा मार्ग खडतर असल्याने टँकर पोहोचणे अडचणीचे होते ,मात्र कंत्राटदाराला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येतील, गावात पिण्याच्या पाण्यासाठी ठोस उपाययोजना करता येतात का यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!