मुंबई लोकलमधून पडून, रेल्वे पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघात होतात. अशा घटनांचे व्हिडिओ देखील समोर येत असताना सध्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये एक माणूस अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. प्लास्टिकच्या बॉटल गोळा करणारा तरुण नेहमीप्रमाणे अंधेरी रेल्वे स्थानकावरून लोकल पकडत होता. त्यावेळी तोल जाऊन पडल्यामुळे ही घटना घडली. मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही प्रवाशांनी असे म्हणणे आहे की, रेल्वे रुळावर उतरला होता. त्याचवेळी लोकल येताच हा तरुण प्लॅटफॉर्मवर चढायला गेला. मात्र दरम्यान लोकलने तरुणाला धडक दिली आणि हा अपघात घडला.
या अपघातामध्ये तरुणाच्या कमरेपासून खालचा संपूर्ण भाग तुटला गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तसंच त्याच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर आरपीएफ जवानांनी आणि रेल्वे प्रवाशांनी तरुणाला बाहेर काढून कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ट्विटरवर ‘दुनिया के खलेश’ या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, एक माणूस लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेला दिसत आहे. या व्यक्तीच्या शरीराचा खालचा अर्धा भाग ट्रेनखाली असून वरचा भाग आणि धड रेल्वे आणि लोकलमधील जागेत अडकले आहे. तसेच इतर प्रवासी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत किंवा त्या माणसाच्या प्रकृतीबाबत प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. लोकल पकडताना हा अपघात अडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.











