पुणे महापालिका कर्मचाऱ्याची भरचौकात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याला जागीच संपवण्यात आले. रविवारी पुण्यातल्या कात्रजरमधील आंबेगाव पठार याठिकाणी ही घटना घडली. या घटनेमुळे कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. दीपक अशोक क्षीरसागर (३८ वर्षे) अस हत्या करणाऱ्या आलेल्या व्यक्तीचे नाव होते. दीपक हे आंबेगावच्या इंद्रायणीनगरमधील समर्थ हाइट्स या इमारतीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते. अनैतिक संबंधाच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या आली. रविवारी रात्री दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत जागीच संपवलं.
सिद्धार्थ संजय हातुरे (वय २६ वर्षे) )आणि ऋषिकेश मनोहर गायकवाड (वय २९ वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी आंबेगाव येथील इंद्रायणी नगरमध्ये राहणारे आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, दीपक क्षीरसागर हे पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करत होते. रविवारी रात्री जेवण केल्यानंतर ते रात्री सव्वानऊच्या सुमारास इंद्रायणीनगर कमानीजवळ त्यांच्या घरासमोर फेरफटका मारत होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी अनैतिक संबंधाचा संशयावरून दीपक यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दीपक यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत फरार झालेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. हे हत्याकांड अनैतिक संबंधाच्या संशयातून झाले असल्याची माहिती समोर आली.











