May 14, 2026 10:29 am

हडपसरमध्ये मध्यरात्री मोठी पोलिस कारवाई; क्रेनच्या सहाय्याने कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

80 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; बीएसएनएलची तांब्याची केबल चोरीचा पर्दाफाश

पुणे : हडपसर औद्योगिक परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. महापालिकेचे काम सुरू असल्याचा बनाव करून सांडपाणी वाहिनीतून गेलेली बीएसएनएल कंपनीची तांब्याची केबल (कॉपर केबल) क्रेनच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा तसेच पुण्यातील काही जणांचा समावेश आहे. अस्लम सगीर खान (वय ३९), सलमान इद्रिस मलिक (वय ३३, दोघे रा. दिल्ली), आरिफ बुंदुखाँ खान (वय ४०), नबी महम्मद शान महम्मद (वय ३५), अनिस अन्सारी महम्मद गियासुद्दीन (वय २२), शोहेब हारुण खान (वय २५, तिघे रा. उत्तर प्रदेश), नरेश कुमार श्रीशिवचरण (वय ४३, रा. हरियाणा), अफाक अन्सारी रफिक अन्सारी (वय २२) आणि प्रवीण दादासाहेब बागुल (वय ३३, दोघे रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हडपसर इंडस्ट्रियल परिसरात काहीजण रेडियम जॅकेट घालून, डोक्यावर हेल्मेट घालून आणि हातात विविध अवजारे घेऊन काम करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला ते महापालिका किंवा अधिकृत कामगार असल्याचा भास निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही टोळी सांडपाणी वाहिनीतून गेलेली बीएसएनएल कंपनीची तांब्याची केबल चोरी करण्याच्या प्रयत्नात होती.

वानवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार अर्शद सय्यद आणि गोपाळ मदने यांना गुप्त माहिती मिळाली होती की, हनीवेल कंपनीजवळ काही संशयित व्यक्ती क्रेनच्या सहाय्याने केबल काढत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत नऊ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरी सुरू असताना हडपसरमधील दोन स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोपींना हटकले होते. मात्र आरोपींनी त्यांना काही रक्कम देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे ३४ लाख ८० हजार रुपयांची कॉपर केबल जप्त केली आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली क्रेन, ट्रक आणि इतर साहित्य असा एकूण ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या केबल चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, शशिकांत लोंढे आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, शहरात औद्योगिक भागांमध्ये वाढत्या केबल चोरीच्या घटनांमुळे उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारी आणि दूरसंचार यंत्रणांच्या महत्त्वाच्या केबल चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून, याचा थेट परिणाम सेवा व्यवस्थेवर होत आहे. पोलिसांनी या टोळीच्या माध्यमातून इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून, आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!