May 14, 2026 9:01 am

कै. सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ अंजली भागवत आणि सुंदर अय्यर यांना जाहीर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष व देशात क्रीडा संस्कृती रुजविणारे माजी रेल्वे राज्यमंत्री व पुण्याचे दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून, यंदापासून सुरु करण्यात आलेल्या या पहिल्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर याचे मानकरी आहेत.

२५,००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेतर्फे हे पुरस्कार दरवर्षी एक खेळाडू व एक क्रीडा संघटक यांना दिले जाणार असून त्याची घोषणा कै. सुरेश कलमाडी यांच्या १ मे या जन्मदिनी दरवर्षी केली जाईल. यंदाच्या पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.

पुण्यात मॅरेथॉन भवन येथे १ मे या कै. सुरेश कलमाडी यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या खेळाडू व क्रीडा संघटकांच्या बैठकीत प्रथम कै. सुरेश कलमाडी यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अॅड. अभय छाजेड म्हणाले की “सुरेश कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे १९९६ ते २०१२ असे तब्बल १६ वर्ष अध्यक्ष होते. तसेच एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे ते २००० ते २०१३ अध्यक्ष होते. याआधी १९८७ ते २००५ अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. २००८ मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे त्यांनी भव्यतेने यशस्वी आयोजन केले.

याशिवाय पुणे, बँगलोर, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गोहत्ती आणि झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि २००३ मध्ये अॅफ्रो-एशियन गेम्स यांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. देशात पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुण्यात भव्यतेने त्यांनी सुरु केली. तसेच पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी उभारण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. देशात त्यांनी अॅथलेटिक्स क्रीडा संस्कृती रुजवली आणि हजारो तरुण खेळाडू पुढे आणण्यात मोलाचे योगदान दिले.

पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या कै. सुरेश कलमाडी यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी यंदापासून हे पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत.” असे अॅड. अभय छाजेड म्हणाले.

अंजली भागवत – अंजली भागवत यांनी २००३ मध्ये मिलान येथे नेमबाजीत पहिला विश्वचषक जिंकला. त्यांनी सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्या अंतिम फेरीपर्यंत पोचल्या होत्या. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेमध्ये त्यांनी १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी मध्ये त्यांचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, त्यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. अंजली भागवत यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ नवे विक्रम प्रस्थापित केले असून, ५५ सुवर्ण, ३५ रौप्य व १६ कांस्य पदके जिंकली. भारतातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्या नावावर ८ नवे विक्रम नोंदले गेले.

सुंदर अय्यर – सुंदर अय्यर हे देशामध्ये अग्रेसर लॉन टेनिस संघटक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून त्यांनी राज्यात लॉन टेनिसच्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले, त्यामुळे जागतिक लॉन टेनिस क्रमवारीत आपल्या खेळाडूंना चांगले स्थान मिळण्यास मोलाची मदत झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स-केपीआयटी चॅलेंजर स्पर्धा आता तीन वर्षांहून अधिक काळ पुण्यात आयोजित केली जात आहे. ही फार मोठी जमेची बाब मानली जाते. त्यांनी लॉन टेनिस मध्ये तरुण मुले व मुली खेळाडू उदयास यावेत यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन तरुण खेळाडूंना संधी देण्यात पुढाकार घेतला.

याप्रसंगी छत्रपती पुरस्कार मानकरी गुरबंस कौर, अर्जुन पुरस्कार मानकरी शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार मानकरी सुरेखा द्रविड, क्रीडा संघटक सचिन आडेकर, आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत पाटील, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक खेळाडू पौर्णिमा जाधव, डर्ट ट्रॅक मोटोक्रॉस खेळाडू अन्वर शेख, कुस्ती पटू आबा जगताप, तसेच राम जागडे, तनवीर शेख, उमेश कंधारे, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, राजू साठे, राकेश भिलारे, ईश्वर ढोले आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!