पुणे ग्रामीण पोलिस व तपासपथकाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केलेल्या जागेची स्थळपाहणी बुधवारी केली. आरोपी भीमराव कांबळेला घेऊन तपास पथक नसरापूर येथे बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आले होते.या वेळी अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व मोठा पोलिस बंदोबस्त होता.
आरोपीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव अत्यंत गोपनीय पद्धतीने, मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही पाहणी करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाहणी करून पथक पुन्हा पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान घटनेच्या दिवशी मद्यप्राशन केल्यामुळे आपल्याला काहीच आठवत नसल्याचे कांबळेने पोलिसांना सांगितले.
ज्या गोठ्यात घटना घडली त्या गोठ्याच्या मालकाकडे आरोपी दोन महिने मोलमजुरी करत होता. त्याच गोठ्यात दोन महिने झोपत होता. त्यामुळे आरोपीने अतिशय विचारपूर्वक हे निर्घृण कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. संबंधित गोठामालकाची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह नसरापूरचे सरपंच, उपसरपंच इतर मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. पीडित मुलीच्या कुटुंबाला शासकीय मदत, नोकरी देण्याची मागणी केली. न्यायिक कामासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी केली.
बायको व कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कांबळेची प्रवृत्ती अधिक विकृत झाल्याचा आरोप साळवड्यातील ग्रामस्थांनी केला आहे. १९९८ मध्ये कोयत्याचा धाक दाखवून गावातील एका ज्येष्ठ महिलेवर कांबळेने अत्याचार केला होता. सदरच्या खटल्यात आरोपीच्या पत्नीने जमीन विकून त्याला मदत केली होती; तर २०१५ मधे जवळच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून ती मुलगी सुटली. न्यायालयात खटला चालला, परंतु त्या वेळेस न्यायालयात खोटी साक्ष देऊन पत्नीने मदत केली. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांतून तो निर्दोष सुटला. त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे करण्यात तो सराईत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या आरोपीचे वकीलपत्र घेण्यास भोर व राजगड वकील संघटनेने नकार दिला आहे, अशी माहिती भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय उरणकर यांनी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी संघटना सहकार्य करणार आहे. कोणीही भीमराव कांबळेचे वकीलपत्र घेऊ नये, असा ठराव संघटनेने केला आहे. या ठरावाला पुणे बार असोसिएशनने पाठिंबा दिला असल्याचे उरणकर यांनी सांगितले.











