May 14, 2026 12:44 pm

एन्काऊंटरच्या भीतीने मुख्य संशयित न्यायालयात हजर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरणातील मुख्य संशयित आफताब समीर शेख याने संभाव्य एन्काऊंटरच्या भीतीने वडगाव मावळ न्यायालयात हजर होत सोमवारी (दि.४ मे) लेखी निवेदन सादर केले. पोलिसांकडून न्याय प्रक्रियेच्या विरुद्ध जाऊन फेक एन्काऊंटर होण्याची शक्यता असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे.

देहूरोड येथे आठ दिवसांपूर्वी रमेश गुरूस्वामी रेड्डी (वय ४२, रा. राजीव गांधीनगर, देहूरोड) यांचा गोळीबार करून निर्घृण खून करण्यात आला होता. दरम्यान रमेश याचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गोळीबार करून खून करण्यात आला होता. विक्रम याच्या खुनाच्या गुन्ह्यात आफताब शेख याची आई आणि भाऊ तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. या रागातून रमेश रेड्डी यांचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आफताब शेख याच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

दरम्यान, या गुन्ह्यातील काही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य संशयित आफताब हा फरार होता. त्याचा विविध पद्धतीने शोध सुरू असतानाच त्याने थेट न्यायालयात हजेरी लावली. वडगाव मावळ न्यायालयात निवेदन सादर केले. चौकशीदरम्यान पोलिसांनी मला दिसताच क्षणी मारण्याचे आदेश असल्याचे सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप आफताब याने निवेदनातून केला आहे. तसेच पोलिसांकडून फेक एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त करत आपल्या जीवाला धोका असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालयात आत्मसमर्पण करण्यास तयार असून, पुढील कारवाईपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी विनंतीही त्याने केली आहे. यापूर्वी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता; मात्र पुणे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याने तो अर्ज नामंजूर झाल्याचेही त्याने नमूद केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वीच संशयितांनी रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून, “आई व भावाला जामीन मिळाला नाही तर सर्वांना जीवे मारू,” अशी धमकी दिली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास पाळत ठेवून रमेश रेड्डी यांच्यावर २१ हून अधिक गोळ्या झाडत खून करण्यात आला होता.

दरम्यान, न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर संशयित आफताब शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासकामी त्याला ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मंगळवारी (दि. ५ मे) पोलिसांनी न्यायालयाकडे निवेदन सादर केले आहे. त्यानुसार, पोलिस बुधवारी (दि. ६ मे) संशयित आफताब शेख याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!