शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुणे पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली असून, लाचखोरीच्या वाढत्या घटनांनी अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. किरकोळ एनसी (नॉन-कॉग्निजेबल) नोंदणीपासून ते गंभीर फसवणूक प्रकरणांपर्यंत ’तोडपाणी’ची ही पद्धतच जणू काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये रूढ झाल्याचे धक्कादायक वास्तव एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) केलेल्या कारवायांतून उघड झाले आहे.
दोन महिन्यांत तीन पोलिस अधिकारी लाचखोरीत अडकले असून, त्यामध्ये एका महिला सहायक पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिस्त आणि कायद्याचे रक्षणकर्ते ही पोलिस दलाची खरी ओळख. परंतु आता या दलाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत पोलिस दलाला काळीमा फासला आहे.
लोहगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच घेताना, एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेला चोवीस तासांचा कालावधी लोटतो न लोटतो तोच आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला सहायक पोलिस निरीक्षकाला तब्बल 28 लाखांच्या लाच प्रकरणात पकडण्यात आले. त्यामुळे पोलिस दलातील लाचखोरीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होते. एकीकडे शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी निपटून काढल्याचा दावा अधिकारी करीत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच हाताखालील कर्मचारी वेगवेगळ्या कारणांनी नागरिकांना लुटत आहेत. हे वास्तव धक्कादायक आहे. लोहगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने तर कशाचीही तमा न बाळगता बेधडकपने थेट पोलिस ठाण्यातच लाच घेतली.
तर ज्या महिला अधिकाऱ्याने आठवड्यापुर्वीच 43 कोटीच्या फसवणूकीची फिर्याद नोंदविली तिने आपल्या साथीदारामार्फत एकाकडून तब्बल 30 लाख रुपये ओरबाडले. एसीबीचे पथक थेट पोलिस आयुक्तालयात पोहचले. त्यामुळे पोलिस ठाण्यापासून ते थेट पोलिस आयुक्तालयापर्यंत लाचखोरीचा बाजार मांडल्याचे दिसते. पोलिस ठाण्याचे वास्तव काही वेगळे नाही. तेथे दाखल होणारे तक्रार अर्ज प्रभारी अधिकाऱ्यांकडून आपल्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांना दिले जातात. अर्जदार कोण आहे? गैरअर्जदार कोण आहे ? त्यावर त्या अर्जाचे अर्थकारण ठरते. कधी तक्रारदाराला मदत करण्यासाठी, तर कधी आरोपीला मदत करण्यासाठी लाचेची मागणी होते. यातूनच काही नागरिक थेट एसीबीची वाट धरतात.
फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर याच्यावर मार्च महिन्यात एसीबीने गुन्हा दाखल केला होता. फसवणुकीच्या संदर्भात एकाची तक्रार होती. खेडकर त्याची चौकशी करत होता. याबाबत तक्रारदाराच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखाची लाच मागितल्यावरून खेडकर याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पदोन्नतीने तोटेवार यांची मुंबई लोहमार्ग येथे बदली झाली होती. त्यांना पुणे शहर पोलिस दलातून कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. त्यानंतर देखील त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना आपल्याकडे चौकशीसाठी देण्यात आलेल्या एका तक्रार अर्जात लाच घेतली.
लोहगाव पोलिस ठाण्यातील पीएसआय मनोज बरुटे याने अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 80 हजारांची लाच मागितली. ती घेताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारादाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी बरुटे याने ही लाच घेतली.











