पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिरपणे, विनापरवाना, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा साठा केलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनकडील तपास पथक मधील पोलिस अधिकारी व अंमलदार असे मिळुन २७/०४/२०२६ रोजी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हददीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. पथकातील पोलिस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोखलेनगर पुणे या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशिरपणे, विनापरवाना, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा साठा करुन त्याची विक्री करत आहेत. बातमीच्या अनुषंगाने लागलीच तपास पथक मधील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीची खात्री केली.
आरोपी अमर नंदु पन्हाळकर (वय ३७ वर्ष, रा. १०१ जनवाडी जनता वसाहत, मारुती मंदिराजवळ, पुणे) याने बेकायदेशिररित्या तंबाखुजन्य गुटखा हा पदार्थ स्वतःचे ताब्यात विक्री करीता जवळ बाळगला असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून १३,५१,१५०/- रु. किं.चा पानमसाला व तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा मुददेमाल व ६,००,०००/- रु. किं.चा टेम्पो, असा एकुण १९,५१,१५०/- रु. किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन गु.र.नं. १७९ / २०२६ भा. न्या. सं. क. १२३, २२३, २०७४, २७५ अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम-२००६ चे कलम २६ (२), २६ (२) (अ), २७ (३) (ब), ३० (२),५९, ३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा अनिकेत पोटे, सहायक पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत. सदर आरोपीला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर, चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलिस आयुक्त, खडकी विभाग, विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननावरे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले व शिर्के यांनी केली आहे.











