आयुष्याच्या नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभी असलेली तरुणी… हातात लग्नाची स्वप्ने आणि अवघे आठ दिवसांवर लग्न… मात्र देवीचे दर्शन करून परतत असतानाच काळाने घाला घालत नवरी मुलीसह तिच्या चुलत वहिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे घडली.
शिखा विनायक बेलसरे आणि मीना मानकर अशी मृत्यू झालेल्या नवरी आणि चुलत वहिनींची नावे आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, श शिखाचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. तर 8 मे रोजी लग्न होणार होते. लग्नाची पत्रिका वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी ती भाऊ शुभम बेलसरे आणि चुलत भाऊ सुनील मानकर, चुलत वहिनी यांच्यासोबत परतवाडा (जि. अमरावती) येथून स्विफ्ट डिझायर कारने गेली होती. गडावर देवीची पूजा करून ओटी भरली, वडिलांना फोनवरून दर्शन झाल्याची माहिती दिली… आणि परतीच्या प्रवासातच नियतीने घात केला.
परत येताना महादेवाचे बांबरुड गावाजवळ कारचे टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि झाडावर आदळले. या भीषण अपघातात शिखा बेलसरे व मीना मानकर यांचा मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर असताना, असा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे.











