May 15, 2026 6:59 am

भरधाव दुचाकीचा मरीन ड्राइव्हवर कहर; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भरधाव येणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मरीन ड्राइव्ह येथे घडली.

हा अपघात इतका भीषण होता, की पादचारी ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीवरील तरुण व तरुणी जागीच ठार झाले. कृष्णा देसाई (वय १९), मुस्कान शेख (वय १८) आणि किशोर लामणे (वय ६२) अशी मृतांची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

कृष्णा मुलुंड येथील रहिवासी असून, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्या हट्टापायी नुकतीच वडिलांनी त्यास नवी दुचाकी घेऊन दिली होती. रविवारी वाढदिवस असल्याने संध्याकाळी ५च्या सुमारास तो घरातून निघाला. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर वडिलांकडून पेट्रोलसाठी पैसे घेतले आणि पहाटे ५च्या सुमारास तो मुस्कानला घेऊन मरीन ड्राइव्हवर आला. भरधाव वेगात पारशी जिमखाना चौकात येताच रस्ता ओलांडणाऱ्या लामणे यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामुळे लामणे सुमारे शंभर फूट लांब फेकले गेले, तर मागे बसलेली मुस्कान हवेत उडून खाली पडली.

धडकेमुळे दुचाकी अनियंत्रित झाल्याने कृष्णा रस्त्याकडेला उभ्या एका चारचाकी, तर दोन दुचाकींना धडकला आणि पडला. पहाटे मरीन ड्राइव्हवर व्यायामासाठी आलेल्यांनी या तिघांना जीटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत दुचाकीस्वार कृष्णाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मुलुंडच्या कृष्णाची कफ परेडच्या मुस्कानसोबत ओळख कशी झाली, रात्री ११ ते अपघात होईपर्यंत कृष्णाने काय केले, तो मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत होता का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.

लामणे हे गिरगाव येथे पत्नीसोबत वास्तव्य करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते मरीन ड्राइव्हवर व्यायामाला येतात, तर मृत तरुणी मुस्कान कफ परेडच्या गीतानगर येथील रहिवासी आहे. एका खासगी कंपनीत टेली कॉलर म्हणून ती नोकरी करते. पहाटे घरातून निघताना मुस्कानने वडिलांची दुचाकी सोबत घेतली होती. ती अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

अपघातात मृत झालेल्या कृष्णा आणि लामणे यांची लगेच ओळख पटली; मात्र मुस्कानची ओळख दुपारी दीडच्या सुमारास पटली. पहाटे ४च्या सुमारास घरातून मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या मुस्कानने स्वतःचा मोबाईल सोबत घेतला होता. पोलिसांनी सिम कार्डवरून तिची ओळख पटवली.

दुचाकी घेऊन रात्री शहरभर फिरू नये, या हेतूनेच पेट्रोलसाठी दोनशेच रुपये दिल्याचे वडील देसाई यांनी पोलिसांना सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!