आजकाल माणुसकी संपलीय, असं आपण सहज म्हणतो, पण शिरूरमध्ये घडलेली एक घटना हे वाक्य खोटं ठरवून गेली. पुण्यातील शिरूरच्या निर्माण प्लाझा परिसरात आज एक थरारक पण मनाला स्पर्श करणारी घटना घडली.
जोशीवाडी येथील एक गरीब गरोदर महिला पोटात तीव्र दुखत असल्यामुळे शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. पण निर्माण प्लाझाजवळ येताच तिच्या प्रसुती कळा खूप वाढल्या. वेदना असह्य झाल्यामुळे ती रस्त्यातच बसली आणि काही कळायच्या आतच तिने तिथेच बाळाला जन्म दिला.
हा प्रकार पाहताच परिसरातील महिलांनी लगेच धाव घेतली. कुणी आपला स्कार्फ काढून आडोसा केला, तर कुणी शेजारच्या घरातून साड्या आणल्या. काही मिनिटांतच त्यांनी तिथे छोटासा सुरक्षित भाग तयार केला. त्या महिलेला धीर देत सर्वजणी मदत करू लागल्या. ही माहिती मिळताच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे आणि पूजा पोटावळे घटनास्थळी पोहोचल्या.
दरम्यान, बाळाचा जन्म झाला होता पण ते रडत नव्हतं. त्यामुळे तिथे उपस्थित सगळ्यांची भीती वाढली. मात्र डॉ. सुनिता पोटे यांनी प्रसंगावधान राखत लगेच बाळाला तपासलं आणि योग्य ती मदत केली. त्यांच्या अनुभवामुळे काही क्षणांतच बाळ रडायला लागलं. तो आवाज ऐकताच सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही वेळापूर्वी तणावात असलेलं वातावरण अचानक आनंदात बदललं. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘निर्माण प्लाझावर झाला निर्माणचा जन्म,’ असं म्हणत सर्वांनी आनंद साजरा केला. रिक्षाचालक, मेडिकल स्टोअरवाले, पत्रकार आणि इतर नागरिकांनीही यावेळी मोठी मदत केली.
यानंतर आई आणि बाळाला मिरा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. ही घटना एक मोठा संदेश देऊन जाते. अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे. अडचणीच्यावेळी कोण कोणाला मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही. आज शिरूरमध्ये फक्त एका बाळाचा जन्म झाला नाही, तर माणुसकीचाही जन्म झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.










