बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते.
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर बागेश्वर बाबा यांनी हे वक्तव्य केलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा. काही दिवस आम्ही काहीच करू इच्छित नाही” असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलं.
“शिवरायांनीमन मोकळं केल्यावर रामदास स्वामी यांनी स्मितहास्य केले. ते म्हणाले की, ठीक आहे. तुम्ही आमचे कोण आहात? शिवाजी महाराज म्हणाले की आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरू आहात. मग शिष्याचं कर्तव्य काय? असा प्रश्न रामदास स्वामी यांनी विचारला. त्यावर जो गुरू आज्ञा देणार त्याचं पालन करण हे शिष्याचं कर्तव्य असल्याचे रामदास स्वामी म्हणाले. रामदास स्वामी यांनी मुकूट उचलला आणि महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालवणार. तुम्हाला संचालन करायचं आहे” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रात विरोध सुरु झाला आहे. “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती’ असं रोहित पवार म्हणाले. ‘भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल’ असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.










