April 25, 2026 5:01 pm

सिंहगड रस्त्यावर ‘आरएमसी’ प्रकल्पांचा धुराळा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द परिसरात रेडिमिक्स सिमेंट (आरएमसी) प्रकल्पामुळे प्रदूषण होत असून, परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवा, त्यानंतर आरएमसी प्रकल्पांसाठीची नियमावली तयार करण्यात यावी, नागरी वस्त्यांजवळ आरएमसी प्रकल्प नको,’ अशी मागणी सिंहगड रस्ता परिसरातील रहिवाशांनी शुक्रवारी केली.

प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सिंहगड रस्ता ‘आरएमसी’ प्रकल्पविरोधी कृती समितीने दिला आहे. समितीचे राजेंद्र पाटील, गणेश पिंपळे, लोकेश भावेकर, ॲड. प्रीतेश चांडगे, आनंद खळदकर, राहुल मांडे, सुयोग केळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वडगाव खुर्द येथील दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रयेजा सिटी मधुकोष सोसायटी आणि परिसरात अनधिकृत आरएमसी प्रकल्प सुरू आहेत. या परिसरात प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम, आर्यन रेसिडेन्सी या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये हजारहून अधिक नागरिक राहतात. शाळेच्या निमित्ताने मुलांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. या प्रकल्पामुळे परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पातून बाहेर पडणारी सिमेंटची धूळ हवेत मिसळून थेट परिसरातील घरांमध्ये, लहान-ज्येष्ठांच्या डोळ्यांत आणि तोंडात जाते. त्यामुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे आजार उद्भवत असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे निरीक्षण कृती समितीतील सदस्यांनी नोंदवले.

या प्रकल्पामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. सिमेंटची वाहतूक करणारे डंपर आणि मिक्सर भर वेगाने धावतात. या वाहनांमधून रस्त्यावर सिमेंट सांडते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचा धोका वाढतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका मिक्सरच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या अनेक समस्या या अनधिकृत आरएमसी प्रकल्पामुळे निर्माण झाल्या आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोपही कृती समितीने केला.

या आरएमसी प्रकल्पावरील नियोजित कारवाई एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपावरून थांबवण्यात आली. या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही सिंहगड रस्ता आरएमसी प्रकल्पविरोधी समितीकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात तातडीने पावले न उचलल्यास आंदोलन करणार असल्याचेही समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनाचीही दखल घेण्यात आली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्याचा इशाराही समितीकडून देण्यात आला.

‘लोहगाव, खांदवेनगर येथील आरएमसी प्रकल्पावर कारवाई करण्यात आली. शहरातील इतर भागांमध्ये आणि पिंपरी-चिंचवड शहरातही या प्रकल्पांवर कारवाई केली जाते. मात्र, सिंहगड रस्ता परिसरातील आरएमसी प्रकल्पावर कारवाई का केली जात नाही, सिंहगड रस्ता परिसरातील आरएमसी प्रकल्प स्थानिक लोकप्रतिनिधींशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ मिळते आणि कारवाई होत नाही,’ असा आरोप कृती समितीने केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!