बारामतीत विमान दुर्घटनेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पवार कुटूंबियांमध्ये दुखवटा पाळला जात असून राजकीय घडामोडींना देखील वेग येताना दिसतोय. एकीकडे रोहित पवार यांनी मौन बाळगलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या दररोज अजितदादांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसला ठेवत आहेत. आज बाराव्या दिवशीही अजितदादांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला अन् आपलं दु:ख व्यक्त केलं. अशातच सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अजितदादांचा तेरावा होत नाही तोपर्यंत…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू. याचा धक्का खासदार सुप्रिया सुळे यांना बसला असून जोपर्यंत अजित दादांना जाऊन तेरा दिवस होत नाहीत तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना मी कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार नाही. तेरा दिवस झाल्यानंतर मी प्रसिद्धी माध्यमांशी बोलेन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
विमान अपघाताची चौकशी
सीआयडीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केली जात आहे. अजित पवार यांच्या सचिवांचीही सीआयडीने चौकशी केली. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांनी सुत्र हातात घेतली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी म्हणावा तसा प्रचार अजिबात केला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोकांचे आभार मानले.
सुनेत्रा पवारांची पहिल्यांदाच पोस्ट
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच पोस्ट केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार, असं सुनेत्रा पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.











