अमेरिकेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू शुभम रांजणे, जेव्हा भारताविरुद्ध शनिवारी (ता. ७) टी-२० विश्वचषकाचा सामना खेळायला उतरेल त्या क्षणाची क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार आहे.याचे कारण म्हणजे त्याचे आजोबा वसंत रांजणे हे भारतासाठी व नातू अमेरिकेच्या संघातून विश्वचषकात खेळण्याचा हा अभूतपूर्व व दुर्मीळ क्षण असेल.
शुभमचे वडील सुभाष रांजणे यांनीही १९ वर्षांखालील संघातून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची नवलाई पुण्यातून घडली आहे.
वसंत रांजणे यांनी १९६०च्या दशकात महाराष्ट्राच्या रणजी संघातून पदार्पण करतानाच नऊ विकेट्ससह हॅट्ट्रिक घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. हा विक्रम आजही अबाधित आहे. सलामीचे वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध भारताकडून कसोटीत पदार्पण केले.
मर्यादित संधीच्या त्या काळात त्यांची कारकीर्द लहान राहिली; मात्र त्यांचा ठसा मात्र खोल उमटवून गेली. त्यांचा मुलगा, सुभाष रांजणे यांनीही क्रिकेटमध्ये स्वतःची वाट निर्माण केली.
सी. के. नायडू, दुलीप, देवधर स्पर्धा आणि रणजी क्रिकेट खेळत १९८७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत त्यांनी ऑस्ट्रेलिया दौरा केला. आंतरराष्ट्रीय स्वप्न पूर्ण झाले नाही; मात्र क्रिकेटची शिस्त, जिद्द आणि स्वप्न त्यांनी आपल्या मुलात रोवली. याचाच परिणाम म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी शुभमच्या हातात बॅट आली.
कॅम्प परिसरातील दस्तूर शाळेत शुभमने त्याचे प्राथमिक शिक्षण आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी १६, १९, २३ आणि २५ वर्षांखालील संघात सातत्याने कामगिरी केली; मात्र त्याला रणजी संघाचे दरवाजे उघडले नाहीत. २०१९ मध्ये ‘आयपीएल’मधील राजस्थान रॉयल्सच्या संघात त्याला संधी मिळाली; परंतु पुढील वाटचालीसाठी त्याने मुंबईकडे प्रस्थान केले.
मुंबईच्या रणजी संघात २०२२-२३ मध्ये त्याचे पदार्पण झाले; पण भारताच्या जर्सीचे स्वप्न दूरच राहिले. उच्चस्तरावर खेळण्याची जिद्द त्याला थेट अमेरिकेकडे घेऊन गेली. तिथे मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्सकडून केलेल्या दमदार कामगिरीमुळे अखेर त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले झाले.
शनिवारी (ता. ७) वानखेडेच्या मैदानावर जिंकणारा संघ कोणताही असो; परंतु रांजणे कुटुंबासाठी हा दिवस विजय-पराभवापलीकडचा असेल. जर्सी बदलली, देश बदलला; पण क्रिकेटचे स्वप्न मात्र तीन पिढ्यांत अखंड जिवंत राहिले.
आमच्यासाठी मोठी गोष्ट : सुभाष रांजणे
शुभमने सुरुवातीपासून खूप परिश्रम करत त्याची वाट शोधली आहे. त्याने देशाचे प्रतिनिधित्व करावे, हे आमचे स्वप्न होते; पण नियतीने वेगळाच मार्ग दिला. आज तो विश्वचषकात एका देशाचे प्रतिनिधित्व करतो, हीच आमच्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे, असे मत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक सुभाष रांजणे यांनी या वेळी व्यक्त केले.











