मोहोळ तालुक्यातील पाचीपट्टा परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याची अफवा पसरल्यानंतर वनविभागाने तातडीने तपास करून हे प्राणी बिबट्या नसून मार्जर कुळातील रान मांजर असल्याचा निर्वाळा दिला आहे. मोहोळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी याबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचीपट्टा परिसरातील एका शेतकऱ्याचा ऊस गाळपासाठी कारखान्याला गेल्यानंतर शेतात उरलेले पाचट पेटविण्यात आले. पाचट जळत असताना त्या आगीच्या ज्वाळांमधून दोन बिबट्या सदृश्य पिल्ले बाहेर पडताना शेतकऱ्यांना दिसली. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्याने मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. तसेच याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी अभिषेक कापसे, बापू वाघमोडे व रावसाहेब माने यांनी संबंधित शेतात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जर तो प्राणी बिबट्या असता तर परिसरातील १५ ते २० किलोमीटरच्या अंतरात शेळ्या, मेंढ्या किंवा अन्य पशुधनावर हल्ल्याच्या घटना घडल्या असत्या. मात्र अशा कोणत्याही तक्रारी अथवा घटना समोर न आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी स्पष्ट केले.
व्हायरल झालेला व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी ते मार्जर कुळातील रान मांजर असल्याचे दिसून आले. बिबट्याचे कान गोल असतात, तर या प्राण्यांचे कान टोकदार व अनुकुचीदार असल्याने तो बिबट्या नसल्याचे स्पष्ट होते. रात्री वनविभागाचे पथक पुन्हा त्या ठिकाणी गेले असता हे प्राणी तेथून निघून गेल्याचे आढळून आले.
यामुळे खबरदारी म्हणून वनविभागाने रात्रभर परिसरात गस्त घालून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली तसेच भयमुक्त वातावरण निर्माण केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वसंरक्षणाबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
“नागरिकांचे फोन आल्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता तो बिबट्या नसून मार्जर कुळातील रान मांजर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,”असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी केले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.











