व्हीआरडीई आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेल्या लॉन्गरेंज ॲन्टी शिप मिसाईल व मोबाईल लॉन्चर व्हेईकल नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाले.
या क्षेपणास्र प्रणालीच्या प्रदर्शनाचे सहनेतृत्व व्हीआडीई-डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विनयकुमार रोकडे यांनी तर वाहनाचे सारथ्य भिंगारचे कैलास लक्ष्मण शेलार या दोन मराठमोळ्या शिलेदारांनी केले.
यंदा नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात भारताच्या संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात आले. या संचलनात अहिल्यानगर स्थित भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा आणि दी व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटद्वारे (व्हीआरडीओ) एलआरएएसएचएम अर्थात लान्गरेंज ॲन्टी-शिप मिसाईल या क्षेपणास्त्र प्रणालीचे पहिल्यांदाच सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले. व्हीआरडीने यासाठी महत्त्वाच्या रोड-मोबाईल लॉन्चर प्रणाली, ऑटोमोटिव्ह सिस्टीमच्या डिझाइन आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘व्हीआरडीई-डीआरडीओचे’ वरिष्ठ शास्त्रज्ञ विनयकुमार रोकडे यांनी संचलनात या प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रदर्शनाचे सहनेतृत्व केले. या चित्तथरारक प्रदर्शनामध्ये क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या वाहनाच्या सारथ्याची जबाबदारी कैलास शेलार यांच्यावर होती. या दोघांनी कर्तव्यपथावर या अत्याधुनिक अस्त्रांचे यशस्वी प्रदर्शन करून राष्ट्रपतींना मानवंदना दिली. डीआरडीओने विकसित केलेले लांब पल्ल्याचे जहाजविरोधी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र एलआरएएसएचएम क्षेपणास्त्र हे अशा प्रकारचे पहिलेच क्षेपणास्त्र आहे.
ते भारतासाठी मॅक १०-५.० वेगाने गतिमान आणि स्थिर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केले आहे. स्वदेशी १२ बाय १२ ‘हाय-मोबिलिटी’ ट्रकवर आधारित रोड-मोबाईल लाँचर प्रणाली, एव्हियोनिक्स आणि सेन्सर्स असलेले, ते वातावरणातील स्किप्ससह कमी-उंचीचे, अर्ध-बॅलिस्टिक मार्ग वापरते, ज्यामुळे उच्च शोधरडार विरुद्ध टिकून राहण्याची क्षमता सुनिश्चित होते. हे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतील एक महत्त्वाचे यश आहे. व्हीआरडीईचे संचालक शास्त्रज्ञ जी. आर. एम. राव आणि शास्त्रज्ञ अंशुमन पोतदार यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली या प्रयोगशाळेने महत्त्वपूर्ण तांत्रिक यश संपादन केले आहे.
हे क्षेपणास्त्र १२ बाय १२ ‘हाय-मोबिलिटी’ ट्रकवर आधारित रोड-मोबाईल लॉन्चर प्रणालीवर तैनात केले होते. हे भारतीय नौदलाच्या किनारपट्टी संरक्षण क्षमतेत मोठी भर घालणारे शस्त्र आहे. जे मोबाईल लॉन्चर व्हेईकल जड, लांब पल्ल्याच्या किंवा कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र प्रणाली वाहून नेण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन केले आहे. सर्व-भूप्रदेश क्षमतेसाठी बनवलेले, हे विशेष वाहन ‘शूट-अँड-स्कूट’ रणनीतींसाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळे शोध आणि प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी जलद तैनाती आणि त्वरित स्थानांतरण शक्य होते.
– विनयकुमार रोकडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व्हीआरडीई-डीआरडीओ
संचलनापूर्वी आठ दिवस कर्तव्यपथावरच कसून सरावर करीत होतो. त्यासाठी पहाटे साडेचार वाजता आमचा दिवस सुरू व्हायचा. आमचा क्रमांक येईपर्यंत सकाळी साडेदहा वाजायचे. वेगळीच ऊर्जा होती. प्रजासत्ताकदिनी संचलनावेळी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसब लागते. कर्तव्यपथावर संचलनाची संधी मिळणे अभिमानाची बाब आहे.
– कैलास शेलार, व्हेईकल ऑपरेटर सी.











