जाधववाडी (ता. जुन्नर) येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील रतन माळी हे पत्नी आशा माळी यांच्या समवेत शनिवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना एका बिबट्याने आशा माळी यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेत जखमी केले.
अचानकपणे हल्ला झाल्याने मोठ्याने त्या ओरडल्यावर बिबट्याने काही क्षणात या ठिकाणाहून पळ काढला. आशा माळी यांच्यावर नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. घटनास्थळी वन विभागाच्या वनपाल गणेश बागडे, वनरक्षक महेश जगधने व रेस्क्यू मेंबर्स यांनी भेट दिली.
दरम्यान आळेफाटा परिसरातील राजुरी, उंचखडक, जाधववाडी, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, आळे, कोळवाडी, सतवाडी, वडगाव आनंद, वडगाव कांदळी या परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या उसाची तोडणी सुरू असल्याने बिबट्यांना लपण क्षेत्र नसल्याने त्यांना ते मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











