April 20, 2026 2:13 am

*कराड शहरात पाण्याच्या मीटर चोरीचा सुळसुळाट;

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कराड शहरात पाण्याच्या मीटर चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सोमवार पेठ, दत्त मंदिर गल्ली परिसर, श्रीधर स्वामी आश्रम परिसर, घाटाजवळील गरुडांचे घर परिसर, राममंदिर परिसर तसेच रॉयल पॅलेस परिसरात सलग दोन ते तीन दिवसांत पाण्याचे मीटर चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड शहरातील अनेक घरांचे पाण्याचे मीटर घराबाहेर, रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेत बसवलेले आहेत. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात हे मीटर काढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी नळाला पाणी येईनासे झाल्यानंतर नागरिकांना मीटर चोरीला गेल्याचे लक्षात येत असून, यामुळे त्यांना आर्थिक नुकसान, मानसिक त्रास तसेच नगरपालिकेच्या कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या वेळी शहरात पोलीस गस्त दिसून येत नसल्याने चोरट्यांना अक्षरशः मोकळे रान मिळाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पोलिस प्रशासनाने संवेदनशील भागांत विशेष गस्त सुरू करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करणे तसेच संशयितांवर कडक नजर ठेवणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नगरपालिकेकडून नागरिकांना पाण्याचे मीटर सुरक्षित ठिकाणी बसवणे, लोखंडी कव्हर लावणे तसेच शेजारी-पाजाऱ्यांच्या सहकार्याने रात्री जागरूकता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, केवळ नागरिकांनीच खबरदारी घेणे पुरेसे नसून प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने समन्वयाने तातडीची व ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कराडसारख्या शहरात मूलभूत सुविधांशी संबंधित चोरीचे प्रकार वाढणे ही गंभीर बाब मानली जात असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास या घटनांत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पाण्याच्या मीटरसह मोटार चोरीच्या घटनांची दखल घेत भाजयुमोचे राज्य सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी नागरिकांशी संपर्क साधत या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले असून, चोरीच्या घटनांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!