प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, पण आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये प्रेमातील अपयशाने एका महिलेला क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडायला लावल्या आहेत. आपल्या प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग मनात धरून, एका नर्सने त्याच्या डॉक्टर पत्नीला चक्क एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला डॉ. श्रावणी या एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांचे पती डॉ. करुणाकर हे देखील त्याच कॉलेजमध्ये डॉक्टर आहेत. मुख्य आरोपी वसुंधरा (३४) ही एक नर्स असून तिचे डॉ. करुणाकर यांच्याशी लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. वसुंधराला करुणाकर यांच्याशी लग्न करायचे होते, मात्र त्यांनी श्रावणी यांच्याशी विवाह केला. हा धक्का वसुंधरा सहन करू शकली नाही आणि तिने सूड घेण्याचे ठरवले.
सिनेस्टाईल कट
वसुंधराने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून प्रेरणा घेऊन हा कट रचला. तिला वाटले की जर श्रावणीला एचआयव्हीची लागण झाली, तर डॉक्टर तिला सोडून देतील आणि पुन्हा वसुंधराकडे परत येतील. या कटात तिने आपली मैत्रीण ज्योती आणि तिच्या दोन मुलांनाही सामील करून घेतले. ज्योतीने सरकारी रुग्णालयातून संशोधन करण्याच्या बहाण्याने एचआयव्ही बाधित रुग्णांचे रक्त मिळवले आणि ते वसुंधराच्या घरातील फ्रिजमध्ये साठवून ठेवले.
९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी डॉ. श्रावणी ड्युटीवरून घरी जात असताना, विनायक घाट परिसरात त्यांच्या स्कूटीला आरोपींनी मुद्दाम धडक दिली. अपघातानंतर जखमी झालेल्या श्रावणी यांना मदत करण्याच्या बहाण्याने वसुंधरा आणि तिच्या साथीदारांनी त्यांना रिक्षात बसवले. याच गडबडीत वसुंधराने संधी साधून श्रावणी यांच्या गळ्यात एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले.
पीडितेच्या सतर्कतेमुळे फुटले भांडे
इंजेक्शन टोचल्यानंतर श्रावणी यांना संशय आला आणि त्यांनी आरडाओरडा केला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी तिथून पळून गेले. श्रावणी यांनी तात्काळ आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. डॉ. करुणाकर यांनी १० जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस कारवाई आणि अटक
कुरनूल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रं फिरवली. तपासात समोर आलेला प्रकार पाहून पोलीसही थक्क झाले. पोलिसांनी मुख्य आरोपी बी. बोया वसुंधरा, तिची मैत्रीण ज्योती आणि ज्योतीची दोन मुले अशा चौघांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पीडित महिला डॉक्टर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. विकृत मानसिकतेतून हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.











