कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी गावाच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मोकळ्या पोल्ट्री शेडचा वापर थेट अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी सायंकाळी केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ५५ कोटी रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहेत.
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरी व दुर्गम परिसरात असलेल्या या पोल्ट्री शेडमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत होते. बाहेरून पाहता हा शेड शेतीपूरक व्यवसायासाठी वापरला जात असल्याचा भास होत होता. मात्र, आतमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीच्या सहाय्याने अमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार एमडी ड्रग्ज, कच्चा रासायनिक माल, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा साठा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी तयार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ड्रग्ज निर्मितीमागे कोणते आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय टोळके कार्यरत आहे, याचा शोध डीआरआयकडून घेतला जात आहे. संबंधित पोल्ट्री शेड सील करण्यात आला असून परिसरात अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण आणि शांत समजल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारे ड्रग्ज माफियांचे जाळे पसरले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या या साखळीचा पर्दाफाश होणे अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
दरम्यान, पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, ही कारवाई राज्यातील ड्रग्जविरोधी लढ्यात महत्त्वाची मानली जात आहे.











