१७ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. हावडा ते कामाख्या या मार्गावर भारतीय रेल्वेची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ झाली. स्लीपर वंदे भारत ट्रेन २२ जानेवारी २०२६ रोजी कामाख्या येथून आणि २३ जानेवारी २०२६ रोजी हावडा येथून नियमित सेवा सुरू करणार आहे. यातच पहिल्या फेरीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट बुकिंग वेटिंग लिस्टवर गेले आहे. प्रवाशांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनला तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन कामाख्या येथून सायंकाळी ०६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ वाजून १५ मिनिटांनी हावडा जंक्शन येथे पोहोचेल. बुधवार वगळता अन्य सर्व दिवस स्लीपर वंदे भारत गुवाहाटी कामाख्या येथून सुटेल. वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर 3rd AC श्रेणीचे दर जेवणासह सुमारे ₹२,३०० असेल. 2nd AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,००० आणि 1st AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,६०० असेल.
२४ तासांत हाऊसफुल्ल, स्लीपर वंदे भारत ट्रेनचा सुपर शो
स्लीपर वंदे भारत ट्रेन (ट्रेन क्रमांक २७५७६) साठी सर्व श्रेणीतील जागा तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी वेळात फुल्ल झाल्या. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकिंग सुरू होताच, प्रवाशांनी काही तासांतच सर्व तिकिटे काढली. तिकिटांची जलद विक्री प्रवाशांमध्ये या नवीन ट्रेनबद्दलचा उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दर्शवते, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
दरम्यान, एकूण ८२३ प्रवाशांना घेऊन जाणारी स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.











