सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात आणि कोणत्याही सत्यतेशिवाय एखाद्याला दोषी ठरवण्याच्या प्रवृत्तीने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. केरळमधील कोझिकोड येथील एका कापड गिरणी कामगाराने सोशल मीडियावरील द्वेष आणि मानहानीला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. केवळ २६ सेकंदांच्या एका व्हिडिओने एका व्यक्तीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, ज्यामुळे डिजिटल बेजबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे नाव, फोटो आणि वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली. अनेकांनी त्याच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, टीका आणि धमक्यांचा मारा केला. या मानसिक दबावामुळे तो तीव्र तणावात होता.
या घटनेमुळे ‘सोशल मीडिया ट्रायल’ या प्रकारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणे आणि त्याची सार्वजनिक बदनामी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
16 जानेवारी रोजी सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना एक 26 सेकंदांचा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तिने आरोप केला की, शेजारी उभे असलेले दीपक यू हे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते.
सोशल मीडिया ट्रायल आणि नफरत
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. नेटकऱ्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय दीपक यांना ‘नराधम’ ठरवून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. दीपक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र सोशल मीडियावरील या ‘डिजिटल शिक्षे’मुळे त्यांचे मानसिक संतुलन कोलमडले.
18 जानेवारीला संपवले जीवन
लोकांच्या सततच्या टोमण्यांना आणि ऑनलाईन छळाला कंटाळून दीपक यांनी 18 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या निधनानंतर आता हे प्रकरण सोशल मीडिया ट्रायलच्या धोक्यांवर एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
कुटुंबियांची पोलीस कारवाई
दीपक यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी असा दावा केला आहे की, दीपक निर्दोष होते. गर्दीच्या बसमध्ये लागलेल्या धक्क्यांमुळे झालेला स्पर्श हा ‘विनयभंग’ म्हणून दाखवला गेला. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, त्या व्हायरल व्हिडिओची आणि दीपक यांच्यावर झालेल्या सायबर बुलिंगची चौकशी सुरू केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आरोप आणि सत्य यामधील फरक लक्षात न घेता सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते.











